सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?

-महावीर सांगलीकर


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच  होता, पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का?.  नाही, कारण बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता. बौद्ध धर्म स्वीकारण्याअगोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता. पण शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जेंव्हा लक्षात आले की प्रस्थापित हिंदू धर्मात दलितांना बरोबरीचे स्थान मिळणे शक्य नाही, तेंव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केलेल्या भाषणात 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही' अशी घोषणा केली. पण त्यावेळी ते नक्की कोणता धर्म स्वीकारणार आहेत हे त्यांनी सांगितले नाही. आपल्या घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी त्यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.  पण बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी धर्मांतराच्या संदर्भात आणखीही कांही घडामोडी झाल्या होत्या, त्याविषयी थोडी माहिती घेणे या विषयाच्या अभ्यासकांना उपयोगी पडू शकते.

येवला येथील 1935 मधील आपल्या भाषणाच्या अगोदरच १९२९ साली त्यांनी आपल्या अनुयायांना सल्ला दिला होता की ' तुम्हाला सन्मान देईल असा कोणताही धर्म स्वीकारायला हरकत नाही'. त्यांच्या या वाक्यातील 'कोणताही धर्म' हे शब्द महत्वाचे आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कांही अनुयायांनी इस्लाम स्वीकारला होता.

१९३६ साली अमृतसर येथे झालेल्या शीख मिशन परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 'हे भाषण मी हिंदू म्हणून करणार असलेले शेवटचे भाषण असेल' असे बाबासाहेबांनी अगोदर जाहीर केले होते. या परिषदेत केरळून आलेल्या थिय्या या दलित समाजाच्या पाच कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते डॉक्टर कुट्टीर यांच्यासह शीख धर्म स्वीकारला.  त्याचवेळी उत्तर प्रदेशातून आलेल्या ५० दलित कार्यकर्त्यांनीही शीख धर्म स्वीकारला.

त्यानंतर शीख धर्माबद्दल असलेली आपली आपुलकी व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला मुलगा व पुतण्या या दोघांनाही हरमिंदर साहिब येथे पाठवले होते. हे दोघेही तेथे दीड महिन्यांहून जास्त काळ राहिले होते.  जून १९३६ मध्ये बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय घेतला. त्यानंतर ते शीख मिशनच्या संपर्कात सतत राहू लागले. मुंबई येथे धर्मांतरीत शीख विद्यार्थ्यांसाठी एक कॉलेज काढण्यावरही विचार झाला.  बाबासाहेबांनी आपल्या 13 अनुयायांना शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर येथे पाठवले. पण विशेष म्हणजे 'फक्त अभ्यास करण्यासाठी' पाठवलेले या तेराही अनुयायांनी प्रत्यक्षात शीख धर्म स्वीकारला.

याच काळात पटियालाचे  महाराज भूपिंदर सिंग यांनी आपल्या बहिणीचे लग्न बाबासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या तरुणाशी लावण्याची तयारी दाखवली. यामागे त्यांचा उद्देश दलित समाजातील न्यूनगंड दूर करून अभिमान तयार करणे हा होता.

पण..........

डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या धर्मांतराबाबत त्या काळातील अकाली दलामध्ये गंभीरपणे विचार करण्यात आला आणि अकाली दलाने एकमुखाने अशा प्रकारच्या सामूहिक धर्मांतरास विरोध केला. यामागे कोणते कारण होते, काय राजकारण होते हे कळत नाही. ते कांहीही असले तरी यामुळे दलितांनी मोठ्या प्रमाणावर शीख धर्म स्वीकारण्यासाठी  बाबासाहेबांनी चालवलेले प्रयत्न वाया गेले.

धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांनी जैन धर्माचाही विचार केला होता. पण शीख धर्माबाबत ते जेवढे गंभीर होते, तेवढे जैन धर्माबाबत नव्हते. धर्मांतराच्या  बाबतीत त्यांनी प्रसिद्ध जैन आचार्य शांतीसागर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण शांतीसागर यांनी अशा प्रकारच्या धर्मांतरास नकार दिला. पण याच काळात दुसरे कांही जैन साधू दलित समाजात जैन धर्माचा प्रचार करत होते, आणि त्यांनी अनेक दलितांना जैन धर्मात प्रवेशही दिला होता. विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान या भागात अनेक दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यात एका जैन मुनींच्या प्रयत्नामुळे कांही दलितांनी जैन धर्म स्वीकारला होता. पण बाबासाहेब जैन धर्माबाबत फारसे गंभीर नव्हते असे दिसते. 

बौद्ध धर्म स्वीकारण्या मागची कारणे
बाबासाहेबांवर मुंजे, कुर्तकोटी शंकराचार्य वगैरेंच्या कडून आणि एकूणच हिंदू समाजाकडून धर्मांतराच्या बाबतीत खूप मोठे दडपण होते. बाबासाहेबांनी हिंदू धर्म अवश्य सोडावा, पण त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती हे धर्म स्वीकारू नयेत अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेबांचीही या दोन धर्मांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका होती. त्यामुळे भारतात जन्मलेले जैन, बौद्ध, शीख धर्म हेच त्यांचे पर्याय होते. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शीख धर्मच निवडला होता. तिथे  सुरवातीला त्यांचे स्वागत झाले होते, पण पुढे अकाली दलाने एकमुखाने अशा धर्मांतरास नकार दिला. बहुधा असा अनुभव पुन्हा येवू नये म्हणूनच बाबासाहेबांनी जैन धर्माचा पर्याय सोडून दिला असावा.

अशा परिस्थितीत धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हाच एकमेव पर्याय उरला होता. या धर्माच्या बाबतीत पथ्यावर पडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बौद्ध  धर्मात यायला त्यांना विरोध करायला,  नकार द्यायला कोणीच शिल्लक नव्हते, कारण त्यावेळी भारतात बौद्ध धर्माचे अस्तित्व जवळ जवळ नव्हतेच. (कोणत्याही प्रस्थापित धर्मात त्याचे अनुयायी नवीन लोकांना प्रवेश द्यायला विरोध करण्याची शक्यता असते. अर्थात याला  अपवाद आहेतच).

पण शेवटी कांही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाही:

1. बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा  निर्णय 1936 साली घेतला, 1937 साली अकाली दलाने त्याला विरोध केला. त्यानंतर त्यांनी 19 वर्षांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारायला एवढा वेळ का लागला?

2. अकाली दलाने विरोध केला असला तरी बाबासाहेबांना इतर मार्गाने शीख धर्म स्वीकारणे शक्य होते, त्याचा विचार त्यांनी का केला नाही?

3. बाबासाहेबांनी इस्लाम धर्मास नकार देणे हे एकवेळ आपण समजू शकतो, पण त्यांनी ख्रिस्ती धर्मास नकार का द्यावा हे कळत नाही. बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नसला तरी वास्तविक पहाता आज भारतात दलित-ख्रिश्चनांची संख्या दलित-बौद्धांपेक्षा जास्त आहे.


 हेही वाचा: 
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य 
दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर 
मातंग वंश  आणि जैन धर्म
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
ओ.बी.सी. आणि जैन धर्म  
महाराष्ट्र आणि जैन धर्म

६ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Mala mahiti naslelya baryach goshti aaplyaa lekha mule mala samjanyas madat zali..

Aapnas ek namr vinanti aahe ki, aapan lekha khali tyababat che vividh sandarbh dyavet, jenekarun wachkas adhik chi mahiti wachta yeyil tyapramanech tumchya matala aadhar suddha milel..

Maze mat krupya sakaratmak prakare ghya.. Tumche lekh kharokharch wichar karayla lawnare aani navin mahiti denare astat...

milindwakale म्हणाले...

खुप छान लेख लिहण्यात आला आहे. विशेषतः हे महत्वाच्या ऐतिहासीक बाबीचे काळजीपुर्वक मांडलेले विचार आहेत. मी खूप मोठा विचारवंत नाही परंतू सदर प्रश्नाची उत्तरे देणे हे माझे कर्तव्य समजुन त्यांची उकल करून देतो.
1. बाबासाहेबांनी 1935 साली घेतलेला धर्मांतराचा निर्णय संपुर्ण भारतातील बहूसंख्य (95%) लोकांना जातीप्रथा अथवा अश्पृश्यतेच्या दलदलीतून बाहेर काढूण समानता, बंधुता शिकवणारा कोणताही धर्म दिण्याचा होता. सूरूवातीला त्यांनी शिख धर्म स्विकारणे योग्य समजले व जातीप्रथा बंद करण्यासाठी हा धर्म योग्य राहील असे त्यांना वाटले. त्याकरीता त्यांनी केलेले प्रयत्न व त्यांना सामोरे आलेल्या समस्या आपणांस The Annihilation of Caste या ग्रंथातील पत्रव्यवहारांवरून व भाषणांतुन कळून येतील. त्यांचा शिख धर्म स्विकारण्याबद्दलचा अनुभव त्यांना भरपूर शिकवुन गेला. त्यांनी जगातील संपूर्ण धर्मांचा आभ्यास केला होता. धर्म या विषयावरील तब्बल 2000 ग्रंथ त्यांनी आभ्यासीले होते. यावरून आपल्या लक्षात हे येईल की त्यांना जवळपास सर्व धर्मांची पाळेमुळे माहीत होती. भारत स्वातंत्र होण्याआधीच (1945 आधी) त्यांनी बौद्ध धम्म स्विकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता या गोष्ठीचा पूरावा जागतीक स्तरावर उपलब्ध आहे. बाबासाहेब हे फक्त धार्मिक विषयांतीलच नाही तर विविध क्षेत्रातील हस्ती होते व धर्मांतराशिवाय त्यांना महत्वाची भरपुर कार्ये होती. त्या कार्यांपूढे धर्मांतर हे दूय्यम दर्जाचे पण महत्वाचे कार्य होते. भरपूर लोकांना हे माहीत नाही की, ते ज्या हिंदू जातीत जन्मले ती पूर्वी बौद्ध होती व त्या जातीने बौद्ध प्रचाराकरीता महाराष्ट्र, मध्यप्रदेश ई. ठिकाणी कामे केली होती. हे जेव्हा त्यांना कळाले त्यावेळी ते अनुवांशिकरीत्याच बौद्ध होते आणि मग धर्मांतराचा प्रश्नच येणार नव्हता. परंतू हे जगाला माहीत नव्हते, शिवाय बराच काळ उलटुन गेला, त्यामुळे धर्मांतर व त्यातल्यात्यात बौद्ध धम्म स्वतःच्या नव्हे तर जगाच्या समाधानाकरीता स्विकारणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी शेवटी दलितांना बौद्ध धम्म दिला व बाकी लोकांना या गोष्टींची जाणिव करून देणे बाकी होते. यावरून समजेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कार्यांचे आयोजन केले होते व काहींकरीता आयुष्य कमी पडले.
2. बाबासाहेबांना इतर मार्गांनी शिख धर्म स्विकारता आला असता व त्यांनी त्या मार्गांचा विचार का केला नाही हा प्रश्न बाबासाहेबांचा धर्मांतरामागचा उद्देश लक्षात घेता, बालकी प्रश्न वाटतो. बाबासाहेब हे दूरदृष्टी असलेले नेता होते शिवाय त्याचा शिख बांधवांबद्दलचा अनूभव लक्षात घ्या व सध्या बंद पाडलेल्या सत्यमेव जयते ह्या मालीकेचा Untouchability हा भाग बघा. आपणांस कळून येईल की ज्याप्रकारे धर्मांतरीत शिख, ख्रिच्श्यन व मुस्लिम बांधवांना त्यांच्या स्वधर्मात अस्पृस्य समजल्या जात आहे ते बाबासाहेबांना त्याकाळीच माहीत होते. त्यामुळे त्यांनी लोकांना बौद्ध धम्म सुचवीला.
3. मुस्लिम धर्माला नकार देणे हे तुम्हाला कळू शकते (माफ करा, तुमचा मुस्लिमांबद्दलचा द्वेष समजुन येतो) पण ख्रिस्ती धर्मास नकार का द्यावा हा प्रश्न बघुया. लोकसंख्या वाढविण्याकरीता ख्रिस्ती होणे बाबासाहेब काय व्ययक्तीगतरीत्या मला सुद्धा मान्य नाही. शिवाय या प्रश्नाचे उत्तर मी आधिच (#2 मुद्द्यात) दिले आहे. बहुजन समाज हा तुकड्या तुकड्यांत विभागाला गेला आहे. त्यांना योग्य नैतृत्व मिळाले नसल्यामुळे व समाजातील अती हुशार लोकांनी इतर बहुजनांना ख्रिस्ती, मुस्लिम, शिख धर्मांकडे वळविले आहे व दुरदृष्टीच्या अभावामुळे जैसे थे च्या अवस्तेत नेले आहे. फक्त शिक्का बदलला परंतु अस्पृष्य तो अस्पृष्यच राहीला.
4. एक आरोप असा सुद्धा आला की जैन धर्माबद्दल ते गंभीर नव्हते किंवा त्यांना जैन धर्म स्विकारता आला असता. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा #2 मुद्द्यात येवु शकते. शिवाय जैन धर्म हा स्वतःला हिंदूंपासुन फारसे वेगळे मानत नाही व तो हिंदू धर्माचाच एक भाग दिसतो. हा धर्म धर्मांतराची उद्देशपुर्तता करू शकत नाही. बौद्ध धम्म हाच भारतीयांना एकमेव पर्याय असून तो राष्ट्रिय एकात्मता, बंधुभाव समाजात आणण्यास समर्थ आहे. तरीही लोकांनी तो आभ्यासुन विचारपुर्वक स्विकारावा अशी मी समस्त वाचकांस नम्र विनंती करतो.

Health and Fitness म्हणाले...

Tarka shudha lekh aahe,
abhari aahe apan changle vidhan mandlya baddal...

Akshay Salve म्हणाले...

सुदभावणेतून लिहिलेला लेख साफ दिसत आहे. आणखी अभ्यास करावा..

Unknown म्हणाले...

सर तुम्ही खूप छान रिप्लाय केला आहे धन्यवाद सर जयभीम नमोबुद्धाय

Manoj म्हणाले...

धन्यवाद सर हा लेख लिहिल्याबद्दल.... अतिशय छान व सोप्या भाषेत लिहिलेला हा लेख येणाऱ्या तरुण पिढीला खूप मार्गदर्शन करेल , आणी खाली दिलेल्या प्रश्र्नांची उतरे जर मिळाली असती तर खुप छान झाल असत सर

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे