सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१२

वैचारिक विकासातील मानसिक अडथळे

-महावीर सांगलीकर


आपण ज्या प्रकारे आणि जो कांही विचार करत असतो, त्यावर समाजातील अनेक घटकांचा प्रभाव असतो. आपल्या लहानपणी आई-वडील, इतर वडीलधारे, शिक्षक, संवगडी आणि तरुणपणी मित्रमंडळी, मेडीया, पुस्तके, नाटक-सिनेमे वगैरे अनेक घटकांकडून आपल्यावर विचारांचा मारा झालेला असतो आणि त्यांचे अनेक बरे-वाईट विचार आपण कळत-नकळत स्वीकारत जातो. यात आपण स्वतंत्र विचार करण्याची आपली शक्ती हरवून बसतो.

आपल्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेवर वरील गोष्टींपेक्षाही जास्त परिणाम घडवून आणणारे घटक प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. त्यांची माहिती करून घेणे अनेकांना उपयोगी ठरेल.

अहंगंड आणि दुराभिमान
लोकांच्या मनात असणारा अहंगंड आणि दुराभिमान या गोष्टी वैचारिक विकासातील मोठे अडथळे आहेत. अनेकांच्या मनात असलेला अहंगंड हा  त्यांना स्वतंत्र विचार करण्यापासून थांबवत असतो. उदाहरणार्थ, आपण ज्या देशात, प्रदेशात, धर्मात, समाजात जन्माला जन्माला आलो त्याचा बहुतेक लोकांना अभिमान असतो आणि त्यात कांही वावगे नाही पण हा अभिमान जेंव्हा अहंगंड बनतो, तेंव्हा असे लोक विचाराशी पूर्ण फारकत घेवून आपली मते बनवत असतात. जसे, आमचा देश हा जगातील सर्वात महान देश आहे, आमचे राज्य भारतातील इतर राज्यांपेक्षा चांगले आहे, आमचा धर्मच सर्वश्रेष्ठ आहे आणि आमचा समाज, त्याला तर तोडच नाही. देश आणि राज्याच्या पुढे जावून अनेक लोक आपला जिल्हा, गाव, गल्ली यांचाही अवाजवी गुणगौरव करताना दिसतात.

अशा प्रकारच्या दुराभिमानामागे स्वत:विषयी अहंगंड हेच कारण असते. माझा  देश महान आहे कारण माझा जन्म या देशात झाला आहे आणि मी ज्या देशात जन्मलो तो देश महान असणारच ही भावना यामागे असते. हीच भावना जातीच्या अभिमानामागेही असते. मी या जातीत जन्माला आलो मग ती जात साधी-सुधी असणार आहे का? आपल्या जातीत जन्माला आलेल्या महापुरुषांच्या विचारांशी बहुतांश  लोकांना कांही देणेघेणे नसते, पण त्यांच्याविषयी भलताच अभिमान असतो. याचे एकमेव कारण म्हणजे जातीय अहंकार जो वैयक्तिक अहंकारातून  तयार झालेला असतो. एक महान व्यकी माझ्या जातीत जन्माला आली आणि मीही त्याच जातीत जन्माला आलो, म्हणजे मीही महान आहे असे विचित्र तर्कशास्त्र यामागे असते.

अहंगंडाप्रमाणे न्यूनगंड हा देखील वैचारिक विकासाला अडथळा आणतो. न्यूनगंडातून तयार झालेला अहंगंड तर आणखी धोकादायक असतो.

व्यक्तिपूजा आणि व्यक्तीद्वेष
व्यक्तिपूजा आणि व्यक्तीद्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या वैचारिक विकासातील आणखी मोठे अडथळे आहेत. ब-याच वेळा व्यक्तिपूजा ही 'आपलेपणा'च्या भावनेतून येते. आमच्या जातीची, आमच्या समाजाची, आमच्या धर्मातील मोठी व्यक्ती म्हणून ती पूजनीय. तिची सारखी वाहवाह केली जाते. मग त्या व्यक्तीला नसते गुणही चिकटवले जातात. जिथे व्यक्तिपूजा आली तिथे व्यक्तीद्वेषही आला. एखाद्या महान व्यक्तीला आपल्या समाजाचे, धर्माचे शत्रू मानून तिची सतत टिंगल- टवाळी करत बसणे हा अनेक व्यक्तीद्वेषी लोकांचा आवडता उद्योग होवून बसतो. या सगळ्यात माणूस आपली विचारशक्ती हरवून बसतो.

व्यक्तीपूजेचा आणखी एक प्रकार म्हणजे आंधळी गुरुभक्ती. आपल्याला ज्यांनी ज्ञान दिले त्यांचाबद्दल आपण आदर ठेवलाच पाहिजे. पण कांही तथाकथित गुरू समाजाला चुकीच्या दिशेने नेत असतात. त्यांच्या भक्तांनी स्वत:ची विचारशक्ती गहाण ठेवलेली असते. त्यामुळे अशा अंधभक्तांकडून स्वतंत्र विचार करण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.

पोथीवाद आणि बाबा वाक्यमं प्रमाणम
अनेकदा लोक एखाद्या विचारसरणीकडे आकर्षित होतात. ही विचारसरणी एखाद्या महान विचारवंताच्या चिंतनातून आकारास आलेली असते. प्रत्येक विचारवंताच्या विचारास स्थळ-काळाची बंधने असतात. पण त्या विचाराचे पुढील काळातील अनुयायी त्या विचारवंताने सांगितलेला शब्द आणि शब्द 'अंतिम सत्य' आहे असे मानतात. हे विचार एखाद्या पुस्तकात लिहून ठेवलेलं असल्यामुळे अशा बाबा वाक्यमं प्रमाणम  या उक्तीचे अनुसरण करणा-यांना पोथीवादी म्हंटले जाते. हा पोथीवाद स्वतंत्र विचारांना बाधक ठरतो.

स्वतंत्र विचार कसा करावा?
प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. त्यातील एकच कोणती तरी बाजू घेवून, तीच बाजू सत्य आहे असे मानणे चुकीचे आहे. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा सर्वांगीण विचार करायला शिकायला पाहिजे. यासाठी आपण घातलेले 'वैचारिक चष्मे' काढून ठेवायला पाहिजेत.

एखादी गोष्ट, मग तो धर्म असो वा समाज, देश-प्रदेश, पक्ष, व्यक्ती वगैरे, केवळ आपल्याशी संबंधीत आहे म्हणून तिचा उदो-उदो करणे थांबवले पाहिजे.

तुमचे विचार हे तुमचे स्वत:चे पाहिजेत. इतरांचे विचार स्वीकारताना त्यांना तावून-सुलाखूनच स्वीकारले पाहिजे, आंधळेपणाने नाही.

स्वत:च्या आणि इतरांच्याही विचारांची चिकित्सा, विश्लेषण करणे या गोष्टी स्वतंत्र विचार करण्यासाठी आवश्यक आहेत. इतरांचे विचार तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतात, पण ते जसेच्या तसे स्वीकारणे, त्यातील शब्द आणि शब्द स्वीकारणे हा भक्तीवादच आहे.

'महान लोक विचारांवर चर्चा करतात, दुस-या दर्जाचे लोक घटनांची चर्चा करतात आणि मूर्ख लोक व्यक्तींबद्दल चर्चा करतात' अशा अर्थाची एक इंग्रजी उक्ती आहे. (Great minds discuss ideas. Average minds discuss events. Silly minds discuss people -Eleanor Roosevelt). याचा अर्थ आपण सगळ्यात अगोदर व्यक्तींच्याबद्दल अवाजवी बरे अथवा वाईट बोलायचे बंद करायला पाहिजे आणि विचार, नवनवीन कल्पना यांची चर्चा करायला शिकायला पाहिजे. व्यक्तींचा उदो-उदो आणि पूजा करणे थांबवले पाहिजे त्यांचा द्वेष करणेही थांबवले पाहिजे. त्याच प्रमाणे पोथीवाद, आंधळी गुरुभक्ती, अहंगंड, दुरभिमान यातूनही बाहेर पडायला पाहिजे. एकदा तुम्ही यातून बाहेर पडला की तुमच्यापुढे येणा-या प्रत्येक विचाराकडे, प्रत्येक घटनेकडे निरपेक्षपणे किंवा त्रयस्थपणे पहायला शिकाल. एकदा का तुम्ही त्रयस्थपणे पहायला शिकलात की तुम्ही स्वतंत्र, मुक्त विचार करायलाही शिकाल!

हेही वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे